आईची गळा आवळून तर मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; दुहेरी हत्याकांडाने खळबळ
नागपूर : आईचा गळा आवळून व मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना कळमेश्वमधील झुणकी मार्गावर सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने कळमेश्वर हादरलं असून पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. आईचे वय ३५ तर मुलीचे वय १० वर्ष असून, त्यांची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमेश्वरमधील झुणकी मार्गावर श्रावण घोडपागे यांचं शेत आहे. त्यांनी ते ललित गणोरकर यांना बटईने (कंत्राटी पद्धतीने) दिलं आहे. दोन दिवसांपूर्वी एक युवक हा महिला व मुलीसह ललित यांच्या शेतात आला. युवकाने त्याचं नाव राकेश ऊर्फ मोहन चंदू शाहू (रा. चिचगाव, नैनपूर, जि. मंडला) असं सांगितलं. त्याने ललित यांना काम मागितले. वर्षभर काम करण्याच्या हमीवर ललित यांनी त्याला कामावर ठेवले. तो महिला व मुलीसह शेतातीलच झोपडीत राहायला लागला. रविवारी रात्री त्याने महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर दगडाने डोके ठेचून मुलीचीही हत्या केली व पसार झाला. सोमवारी दुपारी ललित गणोरकर हे शेतात आले. झोपडीत बघितलं असता मुलगी रक्ताच्या थारोळ्यात तर महिला मृतावस्थेत पडलेली त्यांना दिसली. ललित यांनी कळमेश्वर पोलिसांनी माहिती दिली. पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर, ठाणेदार आसिफ रजा शेख, गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, उपनिरीक्षक शरद गायकवाड यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. दरम्यान, याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WeYgtQ
Post a Comment