Header Ads

ad

बीएमसीच्या आपत्ती नियंत्रण कक्षातही करोना; आणखी तिघांना लागण

मुंबई: संकटकालीन परिस्थिती हाताळणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातील आणखी तीन कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. हे सर्व जण सफाई कामगार असून कोविड पॉझिटिव्ह असलेल्या अन्य दोन कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळं आपत्ती नियंत्रण कक्षातील करोनाबाधितांची संख्या ५ झाली आहे. मागील आठवड्यात महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातील दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनानं सर्वच कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी तिघे पॉझिटिव्ह निघाले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील करोनाचं हॉटस्पॉट असलेल्या वरळी येथील रहिवासी आहे. तर, दुसरे दोघे वडाळा व ठाण्यात राहणारे आहेत. कामासाठी ते रोजच्या रोज प्रवास करून येत होते. '' या तिन्ही रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणं असल्यानं त्यांना वरळी येथील कोविड १० केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. करोनाचे रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण कक्ष सॅनिटायज करण्यात आला असून बहुतेक कामकाज परळ येथील नियंत्रण कक्षातून करण्यात येत आहे, असं महापालिकेतील एका अधिकाऱ्यानं सांगितलं. दरम्यान, महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांना काही दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यासाठी दादर येथील एक हॉटेल घेण्यात येणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KsvyMv

No comments