Header Ads

ad

पालघरमध्ये ज्वेलर्सवर दरोडा; १४ किलो सोने, ६० लाखांची रोकड पळवली

म. टा. वृत्तसेवा, पालघर: जिल्ह्यातील सर्वात मोठ्या येथील बाजारपेठेत एका सोन्या-चांदीच्या दुकानाची भिंत व गॅस कटरच्या साह्याने भरभक्कम लॉकर तोडून दरोडेखोरांनी लॉकरमधील १४ किलो सोने व ६० लाख रुपयांची रोख रक्कम असे एकूण सात कोटी साठ लाखांचा ऐवज चोरून नेला. जिल्ह्यातील या वर्षातील सर्वात मोठा दरोडा समजला जात असून मावळत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला दरोडेखोरांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. बोईसर-तारापूर या मुख्य व दिवसरात्र प्रचंड वाहतूक असलेल्या राज्य मार्गावरील चित्रालय या गजबजलेल्या व्यापारी पेठेतील साई शॉपिंग सेंटरमध्ये श्रीरंग पाटील यांच्या मालकीचे मंगलम ज्वेलर्स हे दुमजली दुकान आहे. त्या दुकानालगत असलेल्या पहिल्या मजल्यावरील क्लासेसच्या शटरचे कुलूप दारोदेखोरांनी प्रथम तोडले. क्लासेस व ज्वेलर्सच्या दुकानामधील भिंत (एक ते दीड फुटाची) गोलाकार कापून त्यामधून ऑक्सिजनचे मोठे व एलपीजीचे छोटे अशी दोन गॅस सिलिंडर आत नेली. गॅस कटरने लॉकर कापून दरोडा टाकून पोबारा केल्याची घटना घडली. मंगळवार मध्यरात्री २.३० वाजता दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज असून दरोडेखोरांनी प्रथम सर्व सायरनचे व सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडून नंतर लूट केली. सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये ८ ते ९ जण दिसत आहेत. भर वस्तीत दरोडा पडल्याने बोईसरसह जिल्ह्यातील सुवर्णाकार दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, बोईसर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी विश्वास वळवी, बोईसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी भेट दिली. तर श्वानपथक व फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. आम्ही लवकरात लवकर मुद्देमालासह दरोदेखोरांना पकडू, असे बोईसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सांगितले. वॉचमन गायब या कॉम्प्लेक्सचा वॉचमन त्याच इमारतीमध्ये राहत असून त्याच्या खोलीत एक ऑक्सिजनचा मोठा सिलिंडर आढळला. वॉचमनही गायब असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवली आहेत, मात्र दोन मोठे सिलिंडर दुसऱ्या मजल्यावर नेईपर्यंत कोणाच्याच कसे लक्षात आले नाही, याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही सिलिंडरवरील नंबर व मार्क दिसू नये, म्हणून ते घासून काढून टाकण्यात आले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2L665w4

No comments