तर त्या बालकांचा जीव वाचला असताः देवेंद्र फडणवीस
नागपूरः भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेची तातडीने दखल घेत चौकशीची आदेश दिले आहेत. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी काही मुद्द्यांवर भूमिका मांडली आहे. 'निष्काळजीपणामुळं १० बालकांना जग पाहण्यापूर्वीच प्राण सोडावे लागले, यापेक्षा वेदनादायी आणखी काय असावे?,' अशी भावूक प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. 'रुग्णालयात फायर सेफ्टीची कुठलीही व्यवस्था नाही. यासाठीचा प्रस्ताव मे महिन्यात आरोग्य सेवा सहसंचालक आणि पुढे मंत्रालयापर्यंत पोहोचला. त्यावर वेळीच निर्णय झाला असता, तर आज या बालकांचे प्राण वाचले असते, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अशाप्रकारे SNCU चालवताना फायर सेफ्टीची व्यवस्था असायला हवी होती, पण ती या ठिकाणी नव्हती,' असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. 'खासगी रुग्णालयांमध्ये तर सुरक्षिततेची सर्व व्यवस्था नसेपर्यंत रुग्णालयाला परवानगी मिळत नाही. पण सरकारी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारचे अनेक प्रस्ताव रखडणे ही गंभीर बाब आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच हवी,' अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LjZNth
Post a Comment