ऊसाच्या फडाला आग, ५ एकरावरील ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे रविवारी भर दुपारी अचानक शेतातील तोडणीला आलेल्या ऊसाच्या फडाला आग लागून पाच एकरावरील ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालं आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून, शेतकऱ्याचे अंदाजे सहा ते सात लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दावरवाडी येथील शेतकरी भिमराव रामभाऊ थोटे यांनी आपल्या पाच एकरच्या क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. ऊसाची लागवड करुन अठरा महिन्याचा कालावधी उलटला, मात्र ऊसतोड न झाल्याने ऊस शेतात उभा होता. रविवार दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास थोटे यांना शेजारील शेतकऱ्याचा फोन आला की, तुमच्या शेतातील उसाला आग लागली आहे. ही माहीती मिळताच त्यांनी गावातील इतर लोकांनी याची माहिती देत शेतात धाव घेतली. थोटे शेतात गेले असता, त्यांच्या गट क्रमांक ३४४ मधील पाच एकरावरील सर्व ऊसाने पेट घेऊन आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे प्रमाण एवढं होतं की, आग विझवण्यासाठी अनेक प्रयत्न करुनही त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न करुन काहीच फायदा झाला नाही आणि तोडणीस आलेला ऊस जळून त्याची चिपाडं बनली. या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झाल्यानं त्याच्या डोळ्यातून अश्रू आले, उपस्थित लोकांचेही डोळे पाणावले. दुष्काळात तेरावा महिना यावर्षी ऊसाची लागवड क्षमतेपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे ऊस तोडणीसाठी कामगार मिळत नसून, कारखान्यात सुद्धा नंबर लागत नाही. त्यामुळे हजारो हेक्टरवर ऊस अजूनही शेतात उभा आहे. त्यातच उन्हाचा पारा वाढत असून, काही ठिकाणी विजांच्या तारांच्या स्पर्शाने ऊसाला आग लागण्याच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे एकीकडे ऊस तोडणी होत नाही तर दुसरीकडे उभा ऊस जळत असल्याच्या घटना पाहता दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wlyPMV6
Post a Comment