Header Ads

ad

मुलगा होण्यासाठी मांत्रिकांच्या मदतीने अघोरी कृत्य; पुण्यात उच्चशिक्षित सुनांचा छळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे: वंशाला दिवा मिळावा; म्हणून मांत्रिकांच्या मदतीने अघोरी कृत्य करून दोन उच्चशिक्षित सुनांचा मुलांच्या मदतीने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार कोथरूड परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत काकडे, त्यांची दोन मुले व कृष्णा गुरूजी यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात कोथरूड पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी उंड्री परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय दोन बहिणींनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सूर्यकांत काकडे, कविता काकडे, जय काकडे, विजय काकडे, अजय काकडे (सर्व रा. सर्वत्र सोसायटी, कृष्णा हॉस्पिटलजवळ, कोथरूड), अश्विनी पुजारी, सुशांत पवार आणि कृष्णा गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ मे ते २४ डिसेंबर २०२१ दरम्यान कोथरूड परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत काकडे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. दोन्ही सुनांनी विदेशात शिक्षण घेतले असून, त्या उच्चशिक्षित आहेत. काकडे यांनी त्यांचा मुलगा विजय व जय या दोघांचे पूर्वी लग्न झाले असतानाही ते लपवून ठेवले. तक्रारदार व त्यांच्या बहिणींसोबत त्यांच्या मुलांचा विवाह लावला. विवाह जमविण्याच्या वेळी काकडे यांनी मुले बीए सिव्हिल झाल्याचे सांगितले; पण त्यांनी बीए सिव्हिल केले नसल्याचे त्यांना समजले. विवाहानंतर मुलगा व्हावा; म्हणून तक्रारदार व तिच्या बहिणीला कृष्णा गुरुजी याने मंत्रून दिलेल्या पावडरचे अस्वच्छ, बेचव व काळे पाणी पिण्यास भाग पडले. मंत्र-तंत्र करून आणलेले व तक्रारदार यांचे नाव लिहिलेले लिंबू त्यांचा पलंगाखाली ठवेले. तक्रारदार बाहेर जात असताना त्यांच्या पर्समध्ये मांत्रिकाने दिलेली पुडी ठेवून जादूटोणा केला. तक्रारदार व त्यांच्या बहिणीच्या संमतीशिवाय नकळत अश्लील व्हिडिओ शूटिंग केले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तक्रारदार यांना धमकी दिली; जीवे मारण्याचीही धमकी दिली. वेगवेगळी पत्रे पाठवून त्यात तक्रारदार व तिचे बहिणीवर खोटे व चुकीचे आरोप करून त्यांची बदनामी केली आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यात तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली. 'अमानुष वागणुकीचा आरोप खोटा' याबाबत बोलताना सूर्यकांत काकडे यांनी सांगितले, की आमच्या घरात सुनांना अमानुष वागणूक देणे; तसेच छळ केल्याचा आरोप खोटा आहे. उलट मुलींची गैरवर्तणूक व त्यांची माहिती आमच्यापासून लपवून फसवणूक केली आहे. आम्ही सत्य परिस्थिती पुराव्यासह न्यायालयात दाखल करणार आहोत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eCnKrJ6

No comments