Header Ads

ad

'राज्यांचे खिसे कापून केंद्राला बादशाही टिकवता येणार नाही'

मुंबई: 'भारत हा संघराज्यातून निर्माण झाला आहे. प्रत्येक राज्याचे स्वत:चे अर्थशास्त्र आहे. ते मजबूत करणे ही जबाबदारी पंतप्रधान म्हणून मोदी यांची आहे. राज्यांना मोडकळीस आणणे म्हणजे देश मोडण्यासारखे आहे. राज्यांचे खिसे कापून केंद्राला आपली बादशाही टिकवता-चालवता येणार नाही,' असा इशारा शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला आहे. वाचा: करोनानंतरच्या लॉकडाऊनमुळं देशातील सर्वच राज्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात ही परिस्थिती अधिक बिकट आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच केंद्र सरकारकडं आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. शिवसेनेनं पवारांच्या मागणीला जोरदार पाठिंबा दिला आहे. 'महाराष्ट्रासारखे राज्य हा देशाचा आर्थिक कणाच आहे. हा कणा मोडू नका, असं शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून सांगण्यात आलं आहे. 'नोटबंदी, जीएसटीसारखे निर्णय फसल्याने व काळा पैसा परदेशातून आणायच्या आणाभाका ‘भाकड कथा’ निघाल्याने करोनानंतरची देशाची अर्थव्यवस्था म्हणजे कसायाने खाटीकखान्यात ढकललेल्या भाकड जनावरासारखी झाली आहे. देशात आज व्यवहारी अर्थशास्त्री दिसत नाही. रिझर्व्ह बँकेवर कोणी काम करायला तयार नाही. सरकारच्या ‘पेढी’छाप अर्थव्यवस्थेस विरोध केल्यानं रघुराम राजन यांच्यासारखे तज्ज्ञ सरकारला नकोसे झाले आहेत. त्यात करोनाचं संकट पुढं आलं आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी देशभरातील सर्व अर्थमंत्र्यांशी एकदा संवाद साधायला हवा, असा सल्लाही देण्यात आला आहे. वाचा: आर्थिक काटकसरीसाठी केंद्रानं आता घेतलेल्या निर्णयांवरही शिवसेनेनं टीका केली आहे. 'सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि खासदारांचं विकासनिधी थांबवून फार काही होणार नाही. हे गावठी उपाय आहेत. महसुलाची कोणती नवी साधने सरकार निर्माण करीत आहे, हे महत्त्वाचं आहे. जनतेच्याच खिशाला कात्री लावणं हे उपाय करायचे असतीलल तर त्यासाठी अर्थमंत्र्यांची गरज नसते. साऊथ ब्लॉकचा एखादा पट्टेवालाही हे उपाय सुचवू शकेल,' असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे. पवार फक्त चाणक्य नव्हे 'कौटिल्य'ही 'शरद पवारांइतका राज्य चालविण्याचा अनुभव असलेला दुसरा नेता आजघडीला देशात नाही. अर्थविषयक विचार मांडणारे मनमोहन सिंग आहेत. ते बोलत असतात, पण शरद पवार यांच्या सांगण्यातले वजन आज महत्त्वाचे आहे. खुद्द मोदींनीही त्यांना आपले गुरू मानले आहे. पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत. सत्तेवर असणे वेगळे व राज्य चालविण्याचा अनुभव असणे वेगळे. त्यामुळे पवारांचा अनुभव या क्षणाला महत्त्वाचा आहे,' अशा शब्दांत पवारांचं कौतुक करण्यात आलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KB1mPA

No comments