Header Ads

ad

खड्डेमुक्तीसाठी पुराला आमंत्रण?; सीमेंट काँक्रीटीकरण रस्त्यांमुळे शहर जलमय होण्याची भीती

'खड्डेमुक्ती'चे काँक्रिटीकरण म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईत यंदाच्या वर्षी डांबरीकरण, सीमेंट काँक्रिटीकरणामुळे रस्ते खड्डेमुक्तीचा दावा पालिकेने केला आहे. मात्र ते दावे केले जात असतानाच पावसाळ्यात रस्ते जलमय होण्याची 'परंपरा' खंडित होईल का, याविषयी मुंबईकरांमध्ये संभ्रम आहे. प्रत्येक वर्षी मुंबईकरांना शहर जलमय होण्याचा प्रचंड त्रास होतो. त्यासाठी मुंबईतील बांधकामाचा प्रचंड वेग, शहराचा बदलता आलेख, नाल्यांमधील कचरा, अपुरी ठरलेली क्षमता, पर्जन्य जलवाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता, नैसर्गिक उतारांची कमी झालेली संख्या अशा विविधांगी कारणांसह त्यात सीमेंट काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांचाही त्यात समाविष्ट झाला आहे. मुंबई पालिकेच्या २०२२-२३च्या अर्थसंकल्पात रस्ते सुधारण्यासाठी तब्बल २,२०० कोटी रु.ची तरतूद केली आहे. पालिकेने २०२१-२२मध्ये १९६ किमींचे रस्ते पूर्ण केले आहेत. या पूर्ण केलेल्या कामात १६३ किमीचे रस्ते सीमेंट काँक्रीटचे असून ७७ किमी रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. यंदाच्या वर्षात पालिकेने २१९ किमी रस्त्यांची कामे करण्याचे उद्देश ठेवले आहे. त्यात सीमेंट काँक्रीटचे २०६ किमींचे रस्ते असून १२.५३ किमी रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल. त्याबाबत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सीमेंट काँक्रिटीकरणाने रस्ते खड्डेमुक्त होतील, असे नमूद केले. त्यांचे दावे प्रत्यक्षात यावेत, अशी लाखो मुंबईकरांची अपेक्षा आहे. सीमेंट काँक्रिटीकरणाने रस्ते खड्डेमुक्त होण्याचा दावा प्रत्यक्षात आला तरीही रस्ते तुंबण्याचे संकट संपुष्टात येईल का, याचे उत्तर मिळालेले नाही. पावसात अनेक ठिकाणी पाणी साचण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात, पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण अधिकाधिक कमी होत चालल्याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला आहे. मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता आणि प्रत्यक्ष पडणाऱ्या पावसात तफावत होते. तसेच, शहरात एका तासात ५० मिमी पाऊस पडल्यास त्यातील २५ मिमी जमिनीत मुरायचा आणि २५ मिमी पावसाचे पाणी नाल्यांमधून वाहून जायचे. मात्र, आता गृहनिर्माण संस्थांसह विविध ठिकाणी पावसाचे पाणी मुरण्याच्या जागा कमी झाल्या असल्याचाही दुष्परिणाम जाणवत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी कुठेही न झिरपत नाल्यातून वाहून जाते. परिसरातील मोकळ्या जमिनीतील मातीत पाणी झिरपत जायचे. पण तिथे काँक्रिटीकरणाने ते पाणी जमिनीवर साचू लागले आहे. त्यासह, अनेक रस्ते उंच केले जाताना आजूबाजूचे भाग सखल भागात येतात. त्यानंतर, सखल भाग नव्याने भर टाकल्याने ते उंच होतात. त्या चक्रात रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रकार थांबत नसल्याचेही मुंबईकरांची खंत आहे. मुंबईत गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठीच पाणी वाहून नेण्याची क्षमता अधिक वाढविणे गरजेचे आहे. तसे केल्यास पाणी साचण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. तसेच, गृहनिर्माण संस्थांमध्येही आजूबाजूचा संपूर्ण परिसर कॉंक्रीटीकरणामध्ये परिवर्तित करू नये, असे मत 'अर्बन सेंटर, मुंबई'चे प्रमुख संचालक पंकज जोशी यांनी व्यक्त केले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bkDv75r

No comments